औशात ‘सक्षम’ जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न; २० दिव्यांगांना इलेक्ट्रिक ट्रायसायकलचे वाटप
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शासकीय योजनांच्या जागरणाने दिव्यांगांना मिळाला आत्मसन्मान
औसा (प्रतिनिधी):
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकास, सक्षमीकरण आणि त्यांना सामाजिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समर्पित असलेल्या 'समदृष्टी, क्षमता विकास एवं अनुसंधान मंडल' (सक्षम) या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने आयोजित लातूर जिल्हा अधिवेशन रविवारी (दि. ४ जानेवारी) औसा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. येथील विजय मंगल कार्यालयात झालेल्या या अधिवेशनातून दिव्यांगांना आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग मिळाला असून, २० लाभार्थ्यांना न्यू मोशन इलेक्ट्रिक ट्रायसायकलचे वाटप करण्यात आले.
सत्रातील महत्त्वाचे मार्गदर्शन
दिव्यांग व्यक्तींच्या शैक्षणिक, आर्थिक आणि मानसिक विकासासाठी हे अधिवेशन दिशादर्शक ठरले. अधिवेशनात विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले:
* स्वयंरोजगार व शासकीय योजना: दिव्यांग व्यक्तींनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग कसे उभे करावेत, यावर सखोल चर्चा झाली.
डॉ. योगेशजी नितुरकर यांनी दिव्यांगांच्या आरोग्यविषयक समस्या आणि उपलब्ध उपचारांबाबत मार्गदर्शन केले.
* क्रीडा क्षेत्रातील संधी: प्रा. डॉ. अशोक वाघमारे आणि श्रीमती महादेवी रणदिवे यांनी क्रीडा क्षेत्रात दिव्यांग खेळाडू कशा प्रकारे नाव कमावू शकतात, यावर प्रकाश टाकला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षपद लातूरचे विभाग संघचालक मा. श्री. संजयजी अग्रवाल यांनी भूषविले, तर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मा. श्री. सुरेश अप्पा ठेसे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी 'सक्षम'चे राष्ट्रीय सहसचिव मा. श्री. सुरेश दादा पाटील, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री. संतोषकुमारजी नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोप सत्रात तहसीलदार घनश्यामजी आडसूळ, रेल्वे स्थानक प्रमुख संजयजी अर्धापुरे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रयजी पवार आणि प्रहार संघटनेचे ओम हजारे यांची विशेष उपस्थिती लाभली.
ट्रायसायकल वाटप
या अधिवेशनाचे मुख्य फलित म्हणजे 'सक्षम एलटीटस' कंपनीच्या संयुक्त विद्यमाने तब्बल २० न्यू मोशन इलेक्ट्रिक ट्रायसायकलचे वाटप करण्यात आले. यामुळे दिव्यांग बांधवांच्या प्रवासाचा प्रश्न सुटून त्यांना रोजगारासाठी मदत होणार आहे.
आयोजनासाठी परिश्रम
या जिल्हास्तरीय अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी 'सक्षम'चे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चव्हाण, सचिव बस्वराज पैके, कोषाध्यक्ष पारस कोचेटा, अमोल कोचेटा, प्रशांत गवंडगावे, विजय जाधव, ज्ञानोबा बंडगिरे, सोमा वाघदरे यांच्यासह संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. आकांक्षा भांजी यांनी तर आभार प्रदर्शन पारस कोचेटा आणि श्रीराम शिंदे यांनी मानले. या अधिवेशनास जिल्हाभरातील दिव्यांग बांधव, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या