औसा किल्ल्याच्या संवर्धनाचा 'नवा अध्याय' सुरू: आमदार अभिमन्यू पवार, मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पाहणी
औसा (प्रतिनिधी):
औसा शहराच्या गौरवाचा आणि इतिहासाचा जिवंत पुरावा असलेला ऐतिहासिक औसा किल्ला लवकरच पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे दिसणार आहे. आमदार मा. अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने, राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. अॅड. आशिषजी शेलार यांच्या उपस्थितीत किल्ल्याच्या संवर्धन आणि विकासाच्या कामासाठी प्रत्यक्ष पाहणी घेण्यात आली.
आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी बोलताना, नलदुर्ग किल्ल्याच्या धर्तीवर औसा किल्ल्याचे सौंदर्य, इतिहास आणि अभिमान पुन्हा उजळवण्याचा निर्धार व्यक्त केला. सुमारे १३ एकर क्षेत्रावर पसरलेल्या या किल्ल्याच्या परिसरात आगामी काळात परिसर स्वच्छता, प्रकाशयोजना, पर्यटक मार्गदर्शन केंद्र, तसेच सांस्कृतिक उपक्रमांसाठी जागा निर्माण करण्याची योजना आहे.
मंत्री शेलार यांचे आश्वासन:
मंत्री आशिषजी शेलार यांनी औसा किल्ल्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान असे संबोधले. ते म्हणाले, “या किल्ल्याचं रूपांतर सुंदर पर्यटनस्थळात करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल.”
किल्ला परिसरात सध्या राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी आमदारांनी स्वीकारली असून, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवी घरे देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या महत्त्वाच्या भेटीवेळी राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, सहसंचालक अमोल गोरे, जया वाहने, आणि वास्तुविशारद तेजस्विनी आफळे हे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, मा. मंत्री आशिषजी शेलार यांनी आमदार निवासस्थानी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी महत्त्वाचं मार्गदर्शन केले.

0 टिप्पण्या