औसा शहरातील प्रभाग 4 मध्ये रेडीमेड स्पीड ब्रेकर बसवा: एमआयएमची मागणी
औसा, दि. १९ सप्टेंबर २०२५: औसा शहरातील प्रभाग क्र. ४ मधील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एमआयएम (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) पक्षाने पुढाकार घेतला आहे. या भागातील नवीन सिमेंट रस्त्यांवर वेगाने चालणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, रेडीमेड स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी करत एमआयएमने औसा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे.
औसा शहराच्या हद्दवाढ भागातील सिमेंटचे आणि डांबरी रस्ते चांगले झाल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे, मात्र वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहेत. यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांसाठी रस्ते धोकादायक बनले आहेत.
एमआयएमचे माजी तालुकाध्यक्ष अँड. गफुरउल्ला हाश्मी आणि माजी शहराध्यक्ष सय्यद कलिम यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सय्यद जमिरोद्दीन, देशमुख शकील, सय्यद मुजीब भाई, पठाण गफुर, अमान बागवान, शेख जिशान, अस्लम नवाब, पठाण अतिक, आणि मेहताब पठाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनामध्ये, तातडीने रेडीमेड स्पीड ब्रेकर बसवून वाहतूक नियंत्रित करावी आणि अपघातांवर आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित होईल आणि रस्ते अधिक सुरक्षित बनतील असा विश्वास एमआयएमने व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या