125 वर्षाची परंपरा असलेले वाशिष्ट चतुरात्र महासोमयाग लातूर जिल्ह्यात प्रथमच

 125 वर्षाची परंपरा असलेले वाशिष्ट चतुरात्र महासोमयाग लातूर जिल्ह्यात प्रथमच






विविध सोमयागाची परंपरा कायम, 45 वे यज्ञ लातूर जिल्ह्यात


22 जानेवारी पासून सेलु येथे महासोमयागाला सुरूवात


औसा प्रतिनिधी : दि. 20

       औसा तालुक्यातील सेलू येथे 22 जानेवारी ते 30 जानेवारी या दरम्यान वाशिष्ठ चतुरात्र महासोमयाग आयोजित करण्यात आला आहे. या सोमयागाची सेलू येथे जय्यत तयारी करण्यात आली असून यज्ञ सोहळ्याला लातूर जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन यज्ञ समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

        संपूर्ण भारत देशामध्ये 125 वर्षाची परंपरा आणि तीन पिढ्या कार्यरत असलेले अग्निहोत्री बहुसोमयागजी दीक्षित श्री यज्ञेश्‍वर रंगनाथ सेलुकर महाराज यांच्या अधिपत्याखाली होत असलेले 29 वे यज्ञ पार पडत आहे. अध्यात्म क्षेत्रामध्ये यज्ञाहूतीला मोठे महत्त्व आहे. या यज्ञामुळे, निसर्गासह मानव जातीला एक ऊर्जा देणारे साधन म्हणजे यज्ञ आहुती आहे. यज्ञाहुती परंपरेचे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्व अधोरेखित झाले आहे. निसर्ग आणि मानवाच्या कल्याणासाठी श्रीकृष्ण महाराज सेलुकर, यांच्या अधिपत्याखाली 125 वर्षांपूर्वी एक सोमयाग यज्ञ पार पडला होता. या सोमयागाची परंपरा त्यांचे पुत्र रंगनाथ महाराज यांनी पुढे चालवली. त्यांच्या कार्यकालात तब्बल 15 विविध सोमयाग यज्ञ झाले. त्यानंतर या यज्ञाची परंपरा यज्ञेश्‍वर महाराज यांनी पुढे चालू ठेवली. त्यांनी आतापर्यंत 28 यज्ञ पार पाडले आहेत. सेलू तालुका औसा हे सेलुकर महाराजांची जन्मभूमी असल्यामुळे यज्ञेश्‍वर महाराजांच्या पुढाकारातून देशभरामध्ये 28 यज्ञ झाले. परंतु आपल्या जन्मभूमी मध्ये एक यज्ञ करण्याचा त्यांचा मानस आणि संकल्प असल्यामुळे त्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी सेलु येथे 22 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीमध्ये नऊ दिवसाचा यज्ञ सोहळा पार पडत आहे. या यज्ञामध्ये 22 जानेवारी रोजी यज्ञ समारंभाचा ध्वजारोहण सोहळा परमपूज्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती स्वामीजी शंकराचार्य संकेश्‍वरपीठ कोल्हापूर, स्वामी श्री रामानंद भारती छत्रपती संभाजीनगर, स्वामी श्री हरीहरानंद भारती धारूर, यांच्या हस्ते होत आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून परमपूज्य माधवानंद सरस्वती स्वामी परमहंस परिब्राजकाचार्य श्री सरस्वती पीठ रंगामपेठ कर्नाटक तर पंडित श्री गणेश्‍वर शास्त्री द्रविड श्री क्षेत्र वाराणसी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

तर यज्ञ कार्यकाळामध्ये सामूहिक श्री सूक्त हवन, किर्तन सेवा यासह आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे. यात 23 जानेवारी रोजी परमपूज्य गहिनीनाथ महाराज औसेकर, 24 जानेवारी रोजी परमपूज्य पद्मनाभ व्यास महाराज तेर 25 जानेवारी रोजी परमपूज्य महादेव महाराज चाकरवाडीकर 26 जानेवारी रोजी परमपूज्य डॉक्टर नारायण शास्त्री नागझरकर 27 जानेवारी रोजी ह भ प प्रसाद महाराज बडवे पंढरपूर 28 जानेवारी रोजी ह भ प अच्युत महाराज दस्तापुरकर 29 जानेवारी रोजी परमपूज्य गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्रीभजन होत आहे. या यज्ञ सोहळ्याला औसा तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील भाविकांनी, या यज्ञ सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन वाशिष्ठ चतुरात्र सोमयाग सेवा समिती व सेलू ग्रामस्थ मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबतची माहिती 20 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेला अ‍ॅडव्होकेट अरविंद कुलकर्णी, जनार्दन माने, संजय कुलकर्णी, प्रकाश पंडगे, मधुकर पंडगे, अरविंद विठ्ठल चामे, ज्ञानोबा पवार, रमेश पंडगे, गणेश प्रल्हाद जाधव, सुभाष माने, बालाजी कुलकर्णी,  यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या