*जी. आय. मानांकित कोथिंबीर आशिवच्या शेतकऱ्यांनी दिली जिल्हाधिकाऱ्यांना भेट*
माजी बाजार समिती संचालक नामदेव माने यांचा पुढाकार
औसा प्रतिनिधी
नुकतेच भौगोलिक मानांकन मिळविलेली औसा तालुक्याची सुप्रसिद्ध कास्ती कोथिंबीर दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घूगे यांना मौजे आशिव येथील शेतकरी उत्पादक गटाचे प्रतिनिधी नामदेव माने व साहेबराव काकडे यांनी आवर्जून भेट दिली. कोथिंबीर आणि कोथिंबीरीचे बियाणे ( धने) त्यांना भेटरुपी दिले. औसा तालुक्यातील या कोथिंबीर पिकास विशिष्ट सुगंधित सुवास आहे, जास्त दिवस टिकून राहण्याची क्षमता अधिक आहे.आणि चकाकी सर्वाधिक असल्यामुळे या भागातील कोथिंबीर बियाण्यास नुकतेच भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले आहे. सदर गटास जी आय नामांकन प्रमाणपत्र ही या गटास मिळालेले आहे. भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी आशिवचा कोथिंबीर उत्पादक गटाने मेहनत घेतली याचबरोबर या गटास शासनाच्या कृषि विभागाचे विशेष सहकार्य मिळाल्यामुळे भौगोलिक मानांकन कोथिंबीर बियाण्यास मिळालेले आहे. आशिव, उजनी, चिंचोली काजळे, मातोळा व वांगजी परिसरामध्ये सदर कोथिंबीर पिकाचे लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. खरीप ,रब्बी आणि उन्हाळी हंगामात सुद्धा हे पीक या भागात घेतली जाते.कमी कालावधीत, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांचा कल कोथिंबीर पिकाकडे वाढत आहे. रब्बी हंगामातील पिकापासून धने म्हणजेच बियाणे घेतले जाते तर खरीप आणि उन्हाळी हंगामातील कोथिंबिरीची मोठ्या प्रमाणात विक्री होते. कृषी विभागातील गाव पातळीवरील कर्मचारी ते सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे व शेतकरी उत्पादक गटामुळे या भागातील कोथिंबीर पिकास भौगोलिक मानांकन मिळालेले आहे.
याच अनुषंगाने आशिव गावचे शेतकरी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना कोथिंबीर भेट दिली. जिल्हाधिकारी यांनी याच्या विक्री संदर्भात सविस्तर चर्चा करून, कोथिंबीर पिकांची परिपूर्ण माहिती घेतली. आपणास प्रत्यक्ष कोथिंबिरीच्या शेतावर येण्यास खूप आवडेल असेही त्यांनी आवर्जून सांगितले. पोळा या शेतकरी सणाच्या दिवशी मी तुमच्या कोथिंबीर प्लॉटला भेट देणार अशी त्यांनी शेतकऱ्यांना बोलताना सांगितले.
याप्रसंगी उपविभागीय कृषि अधिकारी लातूर दिलीप जाधव ,औसा तालुका कृषि अधिकारी संजय कुमार ढाकणे , मंडळकृषि अधिकारी विकास लटूरे हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या