विकासाभिमुख नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर बिनबुडाचे आरोप करण्याचा विरोधकांना नैतिक अधिकार नाही- किरण उटगे
औसा : प्रतिनिधी
औसा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विकासाभिमुख नेतृत्व आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून मतदारसंघांमध्ये विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. परंतु येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याचा विरोधकांना कसलाही नैतिक अधिकार नाही, असे प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष किरण राज शेखर उटगे यांनी केली, औसा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी, औसा मतदार संघाच्या राजकीय संस्कृतीचा आदर राखावा असे स्पष्ट केले, पुढे बोलताना म्हणाले की, औसा शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महसूल प्रशासनामार्फत अतिक्रमण काढून नगरपालिकेस जागा वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असून, हा प्रस्ताव आ. अभिमन्यू पवार यांनी फेर प्रस्ताव पाठवून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. औसा शहरातील रस्ता रुंदीकरण कामात हनुमान मंदिरापासून तिसऱ्या टप्प्याचा रस्ता नैसर्गिक दृष्ट्या सरळ नसल्यामुळे या रस्त्याच्या नगरपालिकेच्या नकाशाप्रमाणे काम पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. तिसऱ्या टप्प्याच्या रुंदीकरणासोबतच लातूर वेस, हनुमान मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत असून शहरात 400 कोटीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून घेतल्यामुळे अनेक कामे प्रगती पथावर आहेत. 45 कोटी वरून 55 कोटी पर्यंत निधी वाढीव मंजूर करून औसा शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी माकणी धरणाची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. 43 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून शहराच्या विस्तारित वस्तीसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली आहे. 150 कोटी रुपयांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय औसा शहरात येत असून, 77 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जलसंपदा विभागाकडून क्रीडा संकुलासाठी 10 कोटी 50 लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी बेलकुंड परिसरात एमआयडीसी मंजूर झाल्याने तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. प्रधानमंत्री पिक विमा योजने संदर्भात बोलताना भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव म्हणाले की, तालुक्यातील 08 पैकी 06 महसूल मंडळ 25 % टक्के अग्रीम पिक विमा साठी पात्र ठरल्याने 77 हजार 641 शेतकऱ्यांना 53 कोटी 70 लाख रुपये मिळाले असून प्रधानमंत्री पिक विमा योजनेमधील अनेक नियम अटी व शर्ती तसेच विमा मिळण्यांच्या निकषाचा विरोधकांनी अभ्यास करावा असे स्पष्ट केले. कृषी विभाग, महसूल विभाग व पिक विमा कंपनी यांच्यात समन्वय आणून उर्वरित पीक विमा शेतकऱ्यांना देण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार प्रयत्नशील आहेत. अहोरात्र मतदार संघाच्या विकासाचा ध्यास घेणाऱ्या लोकप्रतिनिधीवर विरोधकांनी चुकीचे आरोप करून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हेतू साध्य करण्याचा केविलवाना प्रयत्न करू नये. विरोधकांच्या चुकीच्या कृतीला मतदारसंघातील जनताच येणाऱ्या काळात धडा शिकवेल असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. याप्रसंगी पत्रकार परिषदेसाठी औसा भाजप शहराध्यक्ष सुनील उटगे, संतोष चिकुर्डेकर, समीर डेंग, रेवणसिद्ध भागुडे, जगदीश परदेशी, नागनाथ निगुडगे आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या