मराठा आरक्षण मिळविणारच ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण होऊ देऊ नका -मनोज जरांगे पाटील
औसा प्रतिनिधी
मागील अनेक वर्षापासून मराठा समाज हा आर्थिक अडचणीमुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागास राहिला आहे, परिणामी मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण दूर होऊन मराठा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाशिवाय गत नाही म्हणून आपण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण व गावोगावी जाऊन मराठा समाजामध्ये जनजागृती करून समाजाला संघटित होण्याचे आवाहन करीत आहोत. आरक्षण मिळण्यासाठी आपला संघर्ष सुरू असला तरी आरक्षण वेळेपर्यंत आपला हा लढा कायमच राहणार आहे आणि आगामी काळामध्ये हा लढा अधिक तीव्र होईल त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच परंतु त्यासाठी मराठा आणि ओबीसी प्रवर्गातील नागरिकांनी कसलेही प्रकारचे जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मराठा समाज आजही शांत व संयम बाळगत आहे परंतु आमच्या संयमाचा सरकारने अंत न पाहता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे आणि झालेला अन्याय दूर करावा असे प्रतिपादन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले. औसा येथील उटगे मैदानावर आयोजित विराट जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील बोलत होते. स्वतःला ओबीसी चे नेते म्हणून घेणारे छगन भुजबळ यांनी जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपल्या वयाचे भान ठेवून शांत रहावे असा सल्लाही त्यांनी यावेळी भुजबळ यांना दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून घेण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून आरक्षण मिळाल्याशिवाय आपल्या लढा थांबणार नाही, आरक्षणासाठी मी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार आहे. विराट सभेला उपस्थित असलेल्या महिलांना उद्देशून मनोज जरांगे पाटील म्हणाले आपणही गावोगावी जाऊन मराठा समाजातील महिला वर्गामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे येणाऱ्या काळात आपल्या मुला-मुलींचे भविष्य उज्वल घडवायचे असेल आणि यासह आपण या सभेच्या निमित्ताने उन्हात तानामध्ये जो त्रास सहन करीत आहोत असा त्रास भावी पुढील होऊ देऊ नये म्हणून मराठा समाजाने संघटित रित्या लढा उभारला पाहिजे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी बोलताना केले. प्रारंभी मनोज जरांगे पाटील यांनी टेंभी येथील स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या समाधी स्थळास अभिवादन करून औसा शहरात त्यांचे आगमन होताच किल्ला मैदानावर मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी भव्य स्टेज उभारून त्यांचे स्वागत केले. औसा शहरांमध्ये महिला व नागरिकांनी दोन किलोमीटर अंतरावर मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी केली तर जागोजागी क्रेन आणि जेसीबी च्या साह्याने त्यांच्या मिरवणुकीमध्ये पुष्पवृष्टी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांचा मिरवणुकीमध्ये शेकडो युवक मोटर सायकल वरून रॅली काढून सहभागी झाले होते. बागवान समाजाने सभेसाठी येणाऱ्या मराठा बांधवांसाठी अल्पोपहार म्हणून केळी दिल्या तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने सभास्थळी येणाऱ्या नागरिकांसाठी खिचडी ची व्यवस्था करण्यात आली होती. जागोजागी पिण्यासाठी बिसलेरी बॉटल ची व्यवस्था करण्यात आली होती. चार चाकी व मोठ्या वाहनासह मोटार सायकल वरून येणाऱ्या समाज बांधवांसाठी वाहन पार्किंगची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी मराठा समाजातील युवक स्वयंसेवक यांनी उपस्थित पार्किंग करण्याची व्यवस्था लावून दिली. कोणत्याही राजकीय नेत्या च्या वतीने सत्कार न स्वीकारता मनोज जरांगे पाटील यांनी औसा येथील सभेच्या व्यासपीठावर शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याकडून सत्कार स्वीकारला. प्रारंभी जिजाऊ वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी आयोजित विराट सभेसाठी औसा तालुक्यातील हजारो महिला, पुरुष व तरुण वर्ग उपस्थित होता. शेवटी राष्ट्रगीताने विराट सभेची सांगता करण्यात आली.
0 टिप्पण्या