आरक्षण दिल्याशिवाय कोणतीही निवडणूक होऊ देणार नाही- नानासाहेब जावळे पाटील यांचा इशारा
औसा प्रतिनिधी
मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठा लढा पुकारला होता 30 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सातत्याने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असताना राजकीय नेते आरक्षण देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ देणार नाही तसेच आम्ही दिवाळीचा सण हे आरक्षण मिळाल्याशिवाय साजरा करणार नाही असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला.
दिनांक बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी सात वाजता अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आयोजित आशीर्वाद सभेला संबोधित करताना ते बोलत होते. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत असताना काही राज्यकर्ते व ओबीसी नेते आरक्षणाला विरोध करीत आहेत. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील आपल्या जीवाचे रान करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून प्राणांतिक उपोषण करीत आहेत. आज त्यांची प्रकृती खालावलेली असताना सुद्धा सरकारला जाग येत नाही. राज्यभर सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या माध्यमातून तसेच रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होत आहे हे आंदोलन करीत असताना लोकशाही मार्गाने कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता आपला आरक्षणाचा हक्क मिळविण्यासाठी समाज बांधवांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी काही लोकांनी आत्महत्या केली असून आत्महत्या करून आरक्षण मिळणार असेल तर त्याचा उपयोग होणार नाही त्यासाठी अशा प्रकारचा मार्ग कोणीही स्वीकारू नये असेही आवाहन त्यांनी केले. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील भगिनीवर अत्याचार झाला असून अद्याप तिच्या कुटुंबाला न्याय मिळाले नाही. राजकीय नेत्यांनी आपापसात भांडणे लावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे परंतु येणाऱ्या काळात अशा प्रकारची मराठा समाजाची फसवणूक होणार नाही यासाठी समाज बांधवांनी एकत्र येणे आवश्यक आहे. संपूर्ण राज्यभर मराठा समाज एकवटलेला असून अत्यंत पोट तिडकीने आरक्षणाची मागणी करत आहे. समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय येणाऱ्या काळात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही. तसेच प्रत्येक पक्षाच्या राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येणार असून जर खासदार आमदार आपल्या गावात आले तर त्यांची अजिबात गाय करू नका असाही इशारा नानासाहेब जावळे पाटील यांनी याप्रसंगी बोलताना दिला. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित आशीर्वाद सभेस संबोधित करताना नानासाहेब जावळे पाटील पुढे म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला काही झाल्यास होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील असा दमही त्यांनी याप्रसंगी भरला. कै. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या समाधी स्थळावर आशीर्वाद घेऊन आयोजित आशीर्वाद सभेला केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव पाटील, प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे, श्री सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले. टेंभी तालुका औसा येथे आयोजित सभेत धाराशिव व लातूर जिल्ह्याच्या परिसरातून हजारो मराठा बांधव व भगिनी उपस्थित होत्या. शेवटी आरक्षणासाठी आत्मबलिदान केलेल्या मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
0 टिप्पण्या