मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कॅन्डल मार्च काढून महिला रस्त्यावर
औसा प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साखळी उपोषण सुरू असून गावे गावी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावकऱ्यांनी गावबंदी केली आहे. त्या आंदोलनाला काही ठिकाणी गालबोट लागत असून काही ठिकाणी आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे परंतु औसा शहरांमध्ये हजारो महिलांनी दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी सात वाजता औसा शहरातून कॅण्डल मार्च काढून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी लावून धरली. कॅण्डल मार्च च्या माध्यमातून औसा शहरातून हजारो महिला रस्त्यावर उतरल्या असून या कॅन्डल मार्चमध्ये मराठा समाजातील हजारो महिला, पुरुष, युवक, युवती यांनी सहभाग घेत आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कॅन्डल मार्च चा समारोप औसा येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आला. महिलांच्या कॅन्डल मार्च साठी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले आणि पोलीस निरीक्षक सुनील रजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चौक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तसेच औसा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने अँड. गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा लातूर वेस हनुमान मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात आली. आणि ॲड. गुनरत्न सदावर्ते यांच्या धोरणाचा सकल मराठा समाजाने निषेध नोंदविला.
0 टिप्पण्या