औसा शिक्षक पतसंस्थेची गरुडझेप; कर्जमर्यादा २० लाखांवर
सुवर्ण महोत्सवी सभेत चेअरमन महादेव खिचडे यांची घोषणा
औसा/प्रतिनिधी : औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात विश्वास संपादन करत प्रगतीची वाटचाल सुरू ठेवली असून, सभासदांच्या अडचणी लक्षात घेऊन ऑक्टोबर २०२६ पासून कर्जमर्यादा २० लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा चेअरमन महादेव खिचडे यांनी केली.
श्री केदारनाथ मंगल कार्यालय, औसा येथे रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी पतसंस्थेची ५० वी सुवर्ण महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. दत्तात्रय पवार गुरुजी व प्रसिद्ध साहित्यिक इंद्रजीत देशमुख उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती सौ. गंगाबाई कोदळीकर, व्हाईस चेअरमन हरीश आयतनबोने, सचिव संजय जगताप यांच्यासह संचालक व मान्यवर उपस्थित होते.
चेअरमन महादेव खिचडे यांनी संस्थेच्या गेल्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला. कर्जधारक सभासदांकडून कर्जाची नियमित परतफेड होत असल्याने संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत झाली असून, सभासदांच्या विश्वासामुळे पतसंस्थेने प्रगती साधल्याचे त्यांनी सांगितले.
सुवर्ण महोत्सवी सभेत सेवानिवृत्त शिक्षकांचा निरोप, गुणवंत सभासद शिक्षकांच्या पाल्यांचा तसेच पतसंस्थेच्या हितचिंतकांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कर्ज जीवन हमी योजनेच्या लाभाचे वाटप करण्यात आले.
पतसंस्थेच्या उत्तरोत्तर होत असलेल्या प्रगतीचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले.


0 टिप्पण्या