घरकुलांचे थकीत हप्ते त्वरित द्या, अन्यथा पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन; भीम आर्मीचा औसा BDO ना इशारा

 घरकुलांचे थकीत हप्ते त्वरित द्या, अन्यथा पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन; भीम आर्मीचा औसा BDO ना इशारा

​औसा (प्रतिनिधी):

पंतप्रधान आवास योजना व माता रमाई आंबेडकर घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले थकीत हप्ते तात्काळ त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात यावेत, तसेच प्रत्यक्षात काम न करता बोगस पद्धतीने बिल उचलणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी 'भीम आर्मी भारत एकता मिशन' औसा तालुक्याच्या वतीने गट विकास अधिकारी (BDO) यांना कडक इशारा देणारे निवेदन सादर करण्यात आले. येत्या ७ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

​निवेदनात नमूद केल्यानुसार, औसा तालुक्यातील विविध गावांमधील अनुसूचित जाती, जमाती, नवबौद्ध व इतर मागासवर्गीय अत्यंत गरीब व वंचित घटकातील नागरिकांना घरकुले मंजूर झाली आहेत. अनेक लाभार्थ्यांनी आपली जुनी कच्ची घरे पाडून नवीन घरांचे बांधकाम सुरू केले. परंतु, प्रशासनाकडून वेळेवर हप्ते न मिळाल्याने शेकडो लाभार्थ्यांची बांधकामे अर्धवट स्थितीत रखडली आहेत. ऐन पावसा-पाण्याच्या दिवसांत निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, पैशांअभावी गोरगरीब लाभार्थ्यांना खासगी सावकारांकडून महागड्या व्याजाने कर्ज घेण्याची वेळ आली आहे.

​बोगस बिलांवरून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

एका बाजूला प्रामाणिकपणे काम करणारे गरजू लाभार्थी हप्त्यासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही गावांमध्ये प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम न करता संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बोगस पद्धतीने घरकुलांचे बिल उचलण्याचे गंभीर प्रकार घडत असल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे. जिओ-टॅगिंग आणि मोजमाप नोंदणीत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

​भीम आर्मीच्या प्रमुख मागण्या:

​पात्र लाभार्थ्यांचे जिओ-टॅगिंग व मूल्यांकन पूर्ण झाले आहे, त्यांचे थकीत हप्ते अतिशीघ्र खात्यावर वर्ग करा.

​प्रत्यक्ष बांधकाम न करता संगनमताने बिल उचलणाऱ्या दोषी लाभार्थी व अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करा.

​प्रशासकीय दिरंगाई व अडवणूक थांबवून कर्मचाऱ्यांना गतीने काम करण्याचे निर्देश द्या.

​अर्जातील किंवा बँक खात्यातील त्रुटी त्वरित दुरुस्त करून घ्या.

​७ दिवसांत निर्णय न झाल्यास जनआंदोलन!

गरिबांच्या हक्काच्या निवाऱ्याबाबत चाललेली प्रशासकीय दिरंगाई व भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. येत्या ७ दिवसांच्या आत थकीत हप्ते वर्ग न झाल्यास व बोगस बिलांची निष्पक्ष चौकशी सुरू न झाल्यास औसा पंचायत समितीवर तीव्र धरणे आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सर्वस्वी पंचायत समिती प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा भीम आर्मी भारत एकता मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.यावेळी  निवेदनावर  तालुका अध्यक्ष सुनील जोगदंड, जिल्हा संघटक समाधान कांबळे तालुका संघटक किशोर कसबे. आदी पदाधिकारी हजर होते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या