खादी ग्रामोद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे साकडे
औसा येथील खादी केंद्राला आर्थिक मदत व रोजगार निर्मितीसाठी राज्य शासनानेही सहकार्य करण्याची मागणी
औसा, प्रतिनिधी : खादी ग्रामोद्योग समिती, नांदेड अंतर्गत औसा येथील खादी कार्यालयाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून शेकडो कुशल मजुरांना सुतकताई, सतरंजी विणकाम तसेच हातकागद केंद्राच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एकेकाळी नामांकित खादी उत्पादन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेची आर्थिक व प्रशासकीय स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.
या खादी केंद्राचे पुनरुज्जीवन करून कुशल कामगारांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, तसेच केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनानेही आर्थिक मदत व अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संस्थेचे संचालक विजयकुमार बोरफळे व व्यवस्थापक रघुनाथ पोतदार यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे केली. संस्थेच्या पुनर्वसनासाठी आवश्यक अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी त्यांनी आमदारांकडे साकडे घातले.
सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी खादी केंद्रातील कामगारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
खादी ग्रामोद्योगाचे पुनरुज्जीवन झाल्यास परिसरातील पारंपरिक कौशल्य असलेल्या महिला व पुरुष कामगारांना पुन्हा रोजगार मिळण्यास मदत होणार असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अजित मुसंडे, हनुमंत थोरात, पत्रकार राम कांबळे, दिलीप मुसंडे, जयसिंग चव्हाण, भारत माने, बालाजी शिंदे, अभयसिंग बीसेन, पत्रकार जलील पठाण, इलियास चौधरी, मुक्तार मणियार, पाशाभाई शेख, वैभव कुलकर्णी, लिंबाजी देवकते यांच्यासह खादी कार्यालयाचे कार्यकर्ते व सुतकताई करणाऱ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



0 टिप्पण्या