करीम नगर येथील नागरिकांच्या संयमाचा अंत; पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त व रखडलेली पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी
कचरा दोन दिवसांत न उचलल्यास नगर परिषदेसमोर टाकण्याचा इशारा; अन्यथा आंदोलनाचा इशारा..
औसा प्रतिनिधी
औसा, दि. ४ ऑगस्ट :
औसा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील करीम नगर परिसरातील विविध नागरी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते खाजा अजीज शेख यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, करीम नगर परिसरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास वाढला असून, दररोज नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत तीन ते चार जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असून ते उपचार घेत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, परिसरातील पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रखडलेले काम त्वरित पूर्ण करून सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, करीम नगर येथील डॉ. शहेबाज यांच्या घरामागे गेल्या महिनाभरापासून कचऱ्याचा ढीग साचून असून, वारंवार सूचना करूनही नगर परिषद प्रशासनाने तो उचललेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा कचरा दोन दिवसांच्या आत न उचलल्यास तो नगर परिषद कार्यालयासमोर आणून टाकण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
करीम नगरमधील सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते खाजा अजीज शेख यांनी दिला आहे.


0 टिप्पण्या