औसा शहरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; एमआयएमकडून नगर परिषदेला तातडीच्या कारवाईची मागणी
नळांना तोटी बंधनकारक करण्यासह दररोज पाणी तपासणी करण्याची सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांची मागणी
औसा, प्रतिनिधी :
औसा शहरात पावसाळा सुरू झाल्यापासून नळाद्वारे घाण, दुर्गंधीयुक्त व काही भागांत पिवळसर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, डोळ्यांचे आजार, ताप व इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करत एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील पाणीपुरवठ्याची दररोज गुणवत्ता तपासणे आवश्यक असून नगर परिषदेकडून नियमित पाणी तपासणी होत आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची नियमित तपासणी करून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, अनेक ठिकाणी नळांना तोटी नसल्यामुळे दूषित पाणी पुन्हा जलवाहिन्यांमध्ये जाण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सर्व नळधारकांना नळांना तोटी बसविणे बंधनकारक करावे आणि याबाबत विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहराच्या नव्याने विकसित झालेल्या भागांमध्ये दुर्गंधीयुक्त व पिवळसर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून नगर परिषद प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करावा, अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी केली आहे.यावेळी एम आय एम चे शेख अलीम, पठाण हारुननखा, इस्माईल बागवान, अब्दुल समद देशमुख यांच्यासह उपस्थित होते.



0 टिप्पण्या