कलबुर्गी–लातूर नव्या रेल्वेमार्गासाठी ४,९१७ कोटींचा प्रकल्प; कर्नाटक सरकारकडे ५० टक्के खर्च उचलण्याची रेल्वेची विनंती

 कलबुर्गी–लातूर नव्या रेल्वेमार्गासाठी ४,९१७ कोटींचा प्रकल्प; कर्नाटक सरकारकडे ५० टक्के खर्च उचलण्याची रेल्वेची विनंती



१५७.८२ किमीच्या नवीन विद्युतीकृत ब्रॉडगेज मार्गामुळे मराठवाडा–उत्तर कर्नाटकाला मिळणार थेट रेल्वे जोडणी


औसा प्रतिनिधी


कलबुर्गी (कर्नाटक) ते लातूर (महाराष्ट्र) दरम्यान १५७.८२ किलोमीटर लांबीच्या नवीन ब्रॉडगेज विद्युतीकृत एकेरी रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी सुमारे ४,९१७ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला असून तो सध्या रेल्वे बोर्डाच्या विचाराधीन आहे. या प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने ५० टक्के खर्चासह आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती मध्य रेल्वेने राज्य सरकारला केली आहे.


मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) बी. के. गुप्ता यांनी १७ एप्रिल २०२६ रोजी कर्नाटकच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश यांना याबाबत पत्र पाठविले आहे.


सध्या कलबुर्गी आणि लातूर ही शहरे कुर्डुवाडीमार्गे सुमारे ३४५ किलोमीटर आणि हुमनाबादमार्गे २४२ किलोमीटर रेल्वेमार्गाने जोडलेली आहेत. प्रस्तावित नवीन मार्गामुळे दोन्ही शहरांदरम्यान थेट आणि कमी अंतराची रेल्वे जोडणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पातील सुमारे ६१ किलोमीटर रेल्वेमार्ग कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील कलबुर्गी आणि आलंद तालुक्यांतून जाणार आहे.


या रेल्वेमार्गामुळे कच्चा माल, उद्योग आणि बाजारपेठ यांच्यातील संपर्क अधिक वेगवान होण्यास मदत होणार असून शिक्षण, पर्यटन आणि धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणेही सुलभ होणार आहे. प्रवासी, विद्यार्थी, भाविक तसेच उद्योग क्षेत्रासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे रेल्वेने नमूद केले आहे.


रेल्वेच्या डीपीआरनुसार हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य असला, तरी आर्थिकदृष्ट्या आवश्यक असलेला १० टक्के परतावा (ROR) मिळत नसल्याने राज्य सरकारच्या सहभागाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


देशभरात सुरू असलेल्या मोठ्या रेल्वे प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण खर्च रेल्वेला उचलणे शक्य नसल्याने, केंद्र आणि राज्य सरकारच्या ५०:५० खर्च वाटपाच्या तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने सहमती दिल्यानंतर प्रकल्पाला रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.

यामुळे ती उद्योग शिक्षण औद्योगिक प्रकल्पांना मोठी गती मिळेल औसा शहराला विकास चालना मिळेल, भविष्यामध्ये बेंगलोर नागपूर हा शॉर्ट रुट तयार होईल.

हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकातील दळणवळण, औद्योगिक विकास आणि आर्थिक प्रगतीला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या