जुन्या नगरपालिका शॉपिंग सेंटरसमोरील अतिक्रमण हटवूनच नालीचे काम करा
वंचित बहुजन आघाडीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी
औसा प्रतिनिधी :
औसा शहरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या मोठ्या नालीच्या कामात जुन्या नगरपालिका शॉपिंग सेंटरसमोरील अतिक्रमणामुळे अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करत, संबंधित अतिक्रमण हटवूनच नालीचे काम करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या औसा शहर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील एसबीआय बँकेपासून जुन्या नगरपालिका शॉपिंग सेंटरमार्गे हनुमान मंदिरापर्यंत मोठ्या नालीचे काम सुरू आहे. मात्र, शॉपिंग सेंटरमधील काही दुकानदारांनी सुमारे दहा फूट पुढे येऊन अतिक्रमण केल्याने नालीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत.
अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहनचालक व नागरिकांना वाहतुकीदरम्यान मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित दुकानदारांचे अतिक्रमण हटवून शॉपिंग सेंटरच्या भिंतीलगत नालीचे काम करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
अतिक्रमण न हटवता नालीचे काम सुरू ठेवल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कामास विरोध करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर शहराध्यक्ष महावीर बनसोडे, शहर महासचिव सद्दाम पठाण, इलियास चौधरी, ताहेर कुरेशी आणि विशाल बनसोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




0 टिप्पण्या