औसा जिल्हा परिषदेत भाजप-काँग्रेसमध्ये 'काटे की टक्कर'; प्रत्येकी ४ जागांवर विजय, तर पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व

 औसा जिल्हा परिषदेत भाजप-काँग्रेसमध्ये 'काटे की टक्कर'; प्रत्येकी ४ जागांवर विजय, तर पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व


दिपाली भोसले यांना तालुक्यात सर्वाधिक मताधिक्य; भादा गटात ५९ मतांनी भाजपचा निसटता विजय


औसा | प्रतिनिधी


औसा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, जिल्हा परिषदेच्या ९ जागांपैकी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसने प्रत्येकी ४ जागा जिंकत समबळ राखले आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने १ जागेवर विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेत चुरस पाहायला मिळाली असली तरी, पंचायत समितीवर मात्र भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.


९ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतमोजणीत प्रत्येक गटात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. विजयाचे सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहेत:

 * लोदगा गट: भाजपच्या पूनम संतोष मुक्ता यांनी ९,६१९ मते घेत अरुणा संतोष सोमवंशी यांचा पराभव केला.

 * आलमला गट: भाजपच्या शीतल रवी कुमार चिलमे (६,६९३ मते) यांनी काँग्रेसच्या उर्मिला मिठापले यांचा पराभव केला.

 * खरोसा गट: शिवसेना (उबाठा) पक्षाचे तानाजी भानुदास जाधव यांनी ७,६५३ मते मिळवून भाजपचे अजय साळुंखे यांचा पराभव करत शिवसेनेचा भगवा फडकवला.

 * लामजना गट: काँग्रेसच्या शालिनी रामदास चव्हाण (८,१६१ मते) विजयी झाल्या असून त्यांनी भाजपच्या मंदाकिनी बेडजवळगे यांचा पराभव केला.

 * उजनी गट: भाजपचे संदिपान अनिरुद्ध शेळके (६,६७४ मते) यांनी काँग्रेसचे नारायणराव लोखंडे यांचा पराभव केला.

 * आशीव गट: काँग्रेसच्या सईताई पृथ्वीराज गोरे (७,६०३ मते) यांनी भाजपच्या सदिच्छा माने यांचा पराभव करत विजय संपादन केला.

 * किल्लारी गट: काँग्रेसचे सुभाष पांडुरंग पवार (७,०८४ मते) यांनी भाजपचे युवराज बिराजदार यांचा पराभव केला.


मातोळा गटातून काँग्रेसच्या दिपाली शाम भोसले यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी ८,९९० मते घेत भाजपच्या कविता मोरे यांचा २,९०८ मतांच्या फरकाने पराभव केला. हे तालुकयातील सर्वाधिक मताधिक्य ठरले आहे.

दुसरीकडे, भादा गटात अत्यंत चुरशीची लढत झाली. येथे भाजपच्या छाया पद्माकर चिंचोलकर यांनी ८,००९ मते मिळवली. त्यांनी काँग्रेसच्या पूजा खोदाडे यांचा अवघ्या ५९ मतांनी पराभव केला. या निकालाने शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक वाढवली होती.


जिल्हा परिषदेत भाजप आणि काँग्रेसमध्ये बरोबरी झाली असली, तरी पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. पंचायत समिती आता भाजपच्या ताब्यात गेल्याने तालुक्याच्या राजकारणात भाजपचे वजन वाढले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या