शेतकऱ्यांना सरसगट ५० हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी – सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची जोरदार मागणी
औसा प्रतिनिधी:
मराठवाड्यात ११ मेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुग, उडीद, सोयाबीन यांसारखी खरीप पिके पूर्णतः नष्ट झाली असून, हाताशी आलेला माल पावसात वाहून गेला आहे. या संकटग्रस्त परिस्थितीत एम.आय.एम. औसा तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी ठोस पावले उचलली आहेत.
१७ सप्टेंबर रोजी लातूर येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन, प्रभावित शेतकऱ्यांचे पंचनामे करून सरसकट ५०,००० रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी इनामदार यांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी इनामदार यांनी आणखी एक महत्त्वाची बाब समोर ठेवली – २००७-०८ पासून इनाम जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजना मिळत नाहीत. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही या शेतकऱ्यांचे प्रश्न कायम दुर्लक्षित राहिले आहेत.
इनाम जमीन व देवस्थानच्या नावे असलेल्या जमिनींवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सर्व तहसीलदारांना स्पष्ट आदेश द्यावेत, अशीही ठाम मागणी इनामदार यांनी केली.
सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्या या प्रयत्नांमुळे हजारो शेतकऱ्यांच्या न्यायासाठीचा आवाज बुलंद झाला आहे आणि शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या