"औशात जलसमृद्ध औसा अभियानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद – दुष्काळमुक्तीच्या दिशेने लोकसहभागाची नवी चळवळ सुरू"
औसा प्रतिनिधी
औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून आणि क्रिएटीव्ह फाऊंडेशनच्या पुढाकाराने “जलसमृद्ध औसा अभियान” जनसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले. या कार्यक्रमात दुष्काळमुक्तीच्या दिशेने समाजाच्या सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.
या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी हिवरेबाजारचे प्रणेते पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, "गेल्या २५ वर्षात आपण जेवढं पाणी उपसून घेतलं, ते भरून काढणं हे आजचं सर्वात मोठं आव्हान आहे. मात्र लोकसहभाग असेल, तर हे काम देशासाठीही दिशादर्शक ठरू शकतं." त्यांनी आमदार पवार यांच्या शेतरस्त्याच्या यशस्वी पॅटर्नचं कौतुक करत त्यांना "संस्कार सम्राट आमदार" अशी उपाधी दिली.
औसा तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात असून येथे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली. त्यांनी सांगितले की, "तेराशे किमीहून अधिक शेतरस्त्यांचे जाळे आणि उच्चदाब विद्युत उपकेंद्रांची उभारणी सुरू असून जलसमृद्ध औसा हा पुढचा टप्पा आहे."
कार्यक्रमात अॅड. परिक्षीत पवार यांनी अभियानाचा पुढील दृष्टीकोन स्पष्ट केला. "दहा वर्षे अखंडितपणे हे अभियान चालणार असून, टप्प्याटप्प्याने गावे निवडली जातील. ज्याठिकाणी लोकसहभाग अधिक असेल त्या गावांना प्राधान्य दिलं जाईल," असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी, प्रगतशील शेतकरी सीताराम जाधव, माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, पोलिस प्राधिकरणचे उमाकांत मिटकर, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी योगेश्वर उद्योग समूहाकडून २० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त करून या अभियानाला आर्थिक पाठबळही देण्यात आले.
दुष्काळमुक्त औसा ही आता केवळ कल्पना नाही, तर लोकांच्या इच्छाशक्तीने साकार होणारी चळवळ ठरणार आहे.
0 टिप्पण्या