घरकुल बांधकाम परवाना मध्ये अग्नी सुरक्षा फी कमी करा - उमर पंजेशा यांची ठाम मागणी

 घरकुल बांधकाम परवाना मध्ये अग्नी सुरक्षा फी कमी करा -

 उमर पंजेशा यांची ठाम मागणी 


औसा प्रतिनिधी 


औसा – प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत घरकुल योजनेत समाविष्ट लाभार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. औसा नगर परिषदेच्या (क. वर्ग) हद्दीत येणाऱ्या बांधकाम परवान्याच्या प्रक्रियेत अग्निसुरक्षा शुल्क म्हणून ६०००/- रुपये अतिरिक्त आकारण्यात येत होते. परंतु, शहरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत, मजुरी करणारे व छोट्या व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेता ही रक्कम सामान्य नागरिकांसाठी मोठा आर्थिक बोजा ठरत होती.


या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते उमरभाई पंजेशा यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांना निवेदन देत हा अतिरिक्त कर रद्द किंवा कमी करण्याची मागणी केली.


उमरभाई पंजेशा यांनी सांगितले की, "औसा शहरातील बहुतांश नागरिक हे मध्यमवर्गीय असून मजुरी व लघु व्यवसायावर उपजीविका करतात. त्यांच्यावर घरकुलासाठी परवाना घेताना ६००० रुपये अतिरिक्त भरणे कठीण आहे."


मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनीही नागरिकांची परिस्थिती लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका घेतली असून, राज्य शासनाकडे पत्र व्यवहार करून हा शुल्क कमी करता येईल का याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.


मुख्याधिकारी म्हणाले, "ज्यास्तीत जास्त कर कमी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. शासनाला शहरातील नागरिकांची परिस्थिती स्पष्ट करून योग्य तो निर्णय घेण्याची मागणी करू."


या निर्णयामुळे औसा येथील गरीब व मध्यमवर्गीय लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची शक्यता असून, उमरभाई पंजेशा यांच्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या