साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान..
औसा प्रतिनिधी
समदर्गा (ता. औसा, जि. लातूर) —
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्यदिनाचा पवित्र दिवस लक्षात घेऊन, समदर्गा येथील लहुजी प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि कसबे गोरख यांच्या संकल्पनेतून दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी समदर्गा जिल्हा परिषद शाळा येथे स्वच्छता अभियान हा नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी फक्त दीड दिवस औपचारिक शिक्षण घेतले असले, तरी आपल्या साहित्यकृती व विचारांद्वारे समाजातील वंचित, शोषित व उपेक्षित घटकांमध्ये ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या प्रेरणेतून आज समाजातील असंख्य बांधवांनी शिक्षणाच्या जोरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
याच प्रेरणेचा वारसा जपण्यासाठी व पुढील पिढ्यांना आदर्श घालून देण्यासाठी समदर्गा येथील जिल्हा परिषद शाळेतील समाजातील माजी विद्यार्थी आणि लहुजी प्रतिष्ठान समदर्गा यांनी एकत्र येऊन शाळा परिसरातील संपूर्ण स्वच्छता करून स्वच्छता व शिक्षणाबद्दलचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला.
या उपक्रमादरम्यान शाळेच्या इमारती व आवारातील कचरा साफ करण्यात आला, परिसराची देखभाल करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे मार्गदर्शन करण्यात आले.
शालेय समिती, ग्रामस्थ आणि तालुक्यातील मान्यवरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. माजी विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य कार्यामुळे सामाजिक ऐक्य, जबाबदारी व शैक्षणिक संस्कारांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
"शिक्षण हेच खरे सामर्थ्य आणि स्वच्छता हीच खरी सजावट" — या विचारांचा प्रत्यय देणारा हा उपक्रम इतर शाळा व समाजासाठीही प्रेरणादायी ठरेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या