अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने उपेक्षितांना दिला न्याय: विवेक सौताडेकर

 अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने उपेक्षितांना दिला न्याय: विवेक सौताडेकर




औसा प्रतिनिधी:

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या विद्रोही साहित्यातून समाजातल्या उपेक्षित, शोषित आणि पीडित लोकांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, असे प्रतिपादन विवेक सौताडेकर यांनी केले. अण्णाभाऊंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून गिरणी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बंड केले. त्यांच्या साहित्याने उपेक्षितांना आवाज दिला.

माणूस प्रतिष्ठानद्वारा संचलित 'माझं घर' या अनाथ विद्यार्थ्यांच्या शाळेत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमरखानापुरे, संस्थाचालक शरद झरे, बल्ली कांबळे, मच्छिंद्र पुंड, किरण कांबळे, लहुजी शक्ती सेनेच्या मायाताई लोंढे, सुरज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

अण्णाभाऊंचे साहित्य आणि विचार:

सौताडेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी 'फकिरा', 'वारणेचा वाघ' अशा 37 कादंबऱ्या, कथासंग्रह लिहिले. त्याचसोबत त्यांनी वगनाट्य, लावण्या आणि चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. आपल्या पोवाड्यांच्या आणि शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी उपेक्षितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आसूड ओढले. छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र आणि विविध पोवाडे रचून त्यांनी शोषित समाजाच्या वेदनांना फुंकर घातली. त्यांच्या साहित्याचे जगातील विविध भाषांमध्ये अनुवाद झाले असून, रशियासारख्या देशातही त्यांची पुस्तके मोठ्या प्रमाणात विकली जातात, असे त्यांनी नमूद केले.

'पृथ्वी कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे'

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरही क्रांती घडवून आणली. बेळगाव महाराष्ट्राला न मिळाल्याने त्यांच्या मनातील भावना "माझ्या जीवाची होतीय काहिली, माझी मैना गावाकडे राहिली" या रूपकातून व्यक्त झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी गुरु मानले. "शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही," असे सांगताना त्यांनी "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे," हा विज्ञानवादी सिद्धांत मांडला.

सौताडेकर यांनी तरुणांना महापुरुषांचे विचार आत्मसात करून शिक्षणाद्वारे स्वतःचा विकास करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे संभाजी शिंदे, जालिंदर बनसोडे, पंढरीनाथ जाधव, रणजीत कांबळे, श्रीमंत क्षीरसागर, आत्माराम मिरकले, गजानन कठारे, अमोल पुंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अनाथ मुलांसोबत विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी स्नेहभोजन घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या