सोयाबीन अनुदानासाठी ई पिकपाहणी अट रद्द करा
आमदाराच्या संपर्क कार्यालयासमोर वारकरी शेतकरी पायी दिंडीने करणार भजन आंदोलन ..
औसा प्रतिनिधी
औसा :सोयाबीन अनुदान सरसगट देण्यासाठी ई पिकपाहणीची जाचक अट रद्द करा अन्यथा लोकप्रतिनिधीच्या संपर्क कार्यालयासमोर वारकरी शेतकरी भजन आंदोलन करतील असा इशारा शेतकरी नेते राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी औसा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिलेला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि निराधार संघर्ष समिती यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार असून
या देशात सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांच्या मरणावर टपलेले आहे. कृषिप्रधान असणाऱ्या भारतात जय जवान जय किसान ही घोषणा फक्त सभा संमेलनापूरती मर्यादित झालेली आहे.जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाची आवस्था भिक मागणाऱ्या पोतराजासारखी या प्रस्थापित व्यवस्थेने केली आहे.शेतकऱ्यांना वाली उरलेला नाही.
सोयाबीनचे भाव 10 हजार रुपये होते परंतु सरकारने तेल आयात आणि डीओसी विषयी चुकीचे धोरण अवलंबल्याने सोयाबीनचा भाव थेट 4000 रुपयेपर्यंत घसरला त्यामुळे शेतकऱ्याने केलेला खर्च सुद्धा निघाला नाही. प्रचंड नुकसान झाले. आपल्या भागात हेक्टरी 15 क्विंटल सोयाबीन उत्पादन होते. म्हणजेच दीड लाख रुपये अपेक्षित होते परंतु भाव मिळाला चार साडे चार हजार म्हणून हेक्टरी 75 हजार तोटा झाला. त्याची नुकसान भरपायी म्हणून 5 हजार रुपये अनुदान जाहीर केलंय त्यात ही ई पिकपाहणी सारखी जाचक अट घातल्याने असंख्य शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार असल्याने शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.
तुषार ठिबकचे शेतकऱ्यांचे अनुदान गेल्या दीड वर्षांपासून रखडलेले आहे, गत वर्षीचा पीकविमा दिला नाही. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुण दादा कुलकर्णी, राजीव कसबे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी विविध प्रकारची आंदोलने केलेली आहेत परंतु सत्तेच्या मस्तीत असलेले सरकार वाकायला तयार नाही त्यामुळेच जनतेने लोकसभेत हिसका दाखवलाय. आगामी विधानसभेत 440 वोल्टचा झटका निश्चित दाखवू.
दिनांक 23ऑगस्ट 2024 रोजी औसा नाथ संस्थान येथून वारकरी शेतकरी आपल्या टाळ मृदूंगाच्या गजरात पायी दिंडीने येऊन आमदार यांच्या संपर्क कार्यालयासमोर भजन करुन अनोखे आंदोलन करतील असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
या निवेदनावर सर्वश्री राजेंद्र मोरे, राजीव कसबे, दत्ता किणीकर, संपत गायकवाड, नारायण नरखेडकर, लक्ष्मण कांबळे, मोहन चौरे, भरत पाटील, सौदागर वगरे, नवनाथ भोसले, सुरेश सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, साहेबराव जगताप, दगडू बरडे, अमोल जाधव, गुरुनाथ कवठे, चरण सिंह ठाकूर, गणेश मिश्रा, ज्ञानोबा कांबळे, बेबीनंदा, मीराताई, हरिभाऊ मांजरे, सद्दाम भाई, राम रसाळ, हरिभाऊ कुलकर्णी, अशोक देशमाने,बळीराम गरड, दिलदार शेख, इमाम सय्यद यांच्या सह तालुक्यातील कार्यकरर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या