*वक्फ संशोधन विधेयक 2024 म्हणजे राज्य घटनेत हस्तक्षेप व मुस्लिम पर्सनल लॉ वर हल्ला -- हाजी इर्शादभाई*
पुणे - केंद्र सरकारने नुकतेच संसदेमध्ये मांडलेले वक्फ संशोधन विधेयक 2024 हे भारताच्या आदर्श राज्य घटनेत हस्तक्षेप असुन इस्लाम धर्मातील वक्फ संपत्ती विषयी असलेल्या धार्मिक धोरणांच्या मुस्लिम वैयक्तिक कायद्यावर हल्ला आहे. भारताच्या आदर्श राज्य घटनेने मुस्लिम समाजास दिलेल्या संविधानिक मुलभूत हक्क व अधिकारांचे हनन करून केंद्र सरकार मुस्लिम समाजावर अन्याय करीत असल्याचा आरोप समस्त मुस्लिम जमात, महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष हाजी इर्शादभाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.
यावेळी अल्पसंख्यांक विकास मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी, लोकशाही बचाव आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष विजय कांबळे, सुफी इस्लामिक बोर्डाचे पुणे जिल्हाध्यक्ष समदभाई जमादार, सुफी शरफुद्दिन पटेल, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, सरवर पठाण, फैयाज सय्यद, सुहेल शेख, अजिम पटेल, इरफान शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
केंद्र सरकारद्वारा संसदेत आणण्यात आलेले वक्फ संशोधन विधेयक 2024 हे वक्फ संपत्ती संदर्भात असलेल्या इस्लाम धर्मातील वैयक्तिक कायद्याला संपविण्याचे षडयंत्र असुन त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना जाणिव पूर्वक दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे. संविधान विरोधी या विधेयकामुळे वक्फ असलेल्या जमिनी व मालमत्तेवर बेकायदेशीर रित्या अतिक्रण व कब्जा करून हस्तगत करणाऱ्या भुमाफियांना, राजकिय नेत्यांना व भांडवलदारांना वाचविण्यासाठी व वक्फ मंडळांचे अधिकार व अस्तित्व नष्ट करण्याचे उद्देशाने तसेच मुस्लिम समाजाला भूमिहीन करण्यासाठी जाणिव पूर्वक केलेले हे कट कारस्थान आहे. मुस्लिम समाज अशा संविधान विरोधी विधेयकाचा निषेध करीत असून सरकारने अशा प्रकारचे कोणतेही असंविधानिक कृत्य करू नये अशी मागणी हाजी इर्शादभाई यांनी केली आहे.
केंद्र सरकारने कोणत्याही धर्माच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळा ढवळ न करता देशामध्ये ज्वलंत असलेल्या महागाई - बेरोजगारी - मणिपूर सारख्या राज्यात कित्येक महिन्यांपासून निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न - शेजारील देशांकडून भारतामध्ये होत असलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून भारताच्या विकासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन हाजी इर्शादभाई यांनी केले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत ज्या मुस्लिम समाजाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाला भरभरून मतदान करून जीवदान दिले त्याच पक्षाच्या खासदारांनी मुस्लिम समाजाशी निगडीत असलेल्या वक्फ संशोधन विधेयक 2024 संसदेच्या सभागृहात चर्चेत असताना त्यास विरोध न करता अथवा त्यावर चर्चा न करता सभागृहातून निघून जाणे हे कृत्य मुस्लिम समाजाच्या उपकारांची जाण न ठेवता विश्वासघाती व पाठीत खंजीर खुपसण्या सारखे असल्याची टिका हाजी इर्शादभाई यांनी केली असुन वक्फ संशोधन विधेयक 2024 या भारताच्या आदर्श राज्य घटना विरोधी व मुस्लिम वैयक्तिक कायद्याविरोधी विधेयका संदर्भात शिवसेनेची भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावी असे आवाहन हाजी इर्शादभाई यांनी केले आहे.
0 टिप्पण्या