धनगर आरक्षणासाठी औसा येथे आक्रोश मोर्चाने घडविला इतिहास
औसा प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेनुसार धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक 36 नुसार समावेश असताना सुद्धा राजकीय पक्षाच्या नाकर्तेपणामुळे व दुर्लक्ष पणामुळे स्वातंत्र्याच्या 60 ते 65 वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रापासून वंचित आहे. घटनेतील अधिकारानुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे. या मागणीसाठी शुक्रवार दि 29 डिसेंबर 2023 रोजी औसा येथील किल्ला मैदानावरून हजारो धनगर बांधवांनी आक्रोश मोर्चातून आरक्षणासाठी एल्गार करीत इतिहास घडविला. मोर्चामध्ये हजारो समाज बांधव महिला युवक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह पारंपारिक धनगरी ढोल आणि हलगीच्या निनादामध्ये येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करीत धनगर समाजाला आरक्षण त्वरित लागू करावे अशी मागणी केली. औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून हजारो महिला व युवकांनी हातात पिवळे झेंडे गळ्यात गमजा व डोक्यावर पिवळ्या टोप्या घालून प्रशासनाचे लक्ष वेधले.सकल धनगर समाजाच्या वतीने आयोजित या मोर्चामध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, समाजाच्या आर्थिक शैक्षणिक व सामाजिक मागासले पण दूर करण्यासाठी विविध महामंडळाला हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी, मेंढपाळ बांधवांवरील हल्ले थांबवून मेंढ्या चारण्यासाठी गायरान वनीकरणांमध्ये मोफत परवाने द्यावेत, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना वस्तीगृहामध्ये मोफत राहण्याची सुविधा उपलब्ध करावी. या मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार दत्ता कांबळे यांच्याकडे शालेय विद्यार्थिनींच्या वतीने देण्यात आले. या मोर्चाची सुरूवात किल्ला मैदान औसा येथून करण्यात येऊन समारोप तहसील कार्यालय औसा येथे करण्यात आला.या मोर्चास वीरशैव लिंगायत समाज आणि सकल मराठा समाजाने धनगर आरक्षणास पाठिंबा असल्याचे पत्र धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.धनगर समाजाचे आरक्षण तात्काळ लागू नाही केल्यास आगामी काळात धनगर समाज शेळ्या मेंढ्याचे कळप व कुटुंबासह रस्त्यावर उतरणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तहसील कार्यालय औसा येथे सर्वश्री गणेश हाके,डॉ स्नेहा सोनकाटे, घनश्याम हाके, देविदास काळे,सौ ज्योती भोकरे,हनुमंत कांबळे, राजेश सलगर ,राम कांबळे, नितीन बंडगर, सुधाकर लोकरे, उद्धव काळे,आकाश कांबळे, मोहन चौरे ,तानाजी होळकर , सौ प्रमिला कांबळे,सुमन कांबळे, शशिकला दुधभाते,ज्ञानेश्वरी कांबळे, गोदावरी कांबळे,सविता गाडेकर, छाया कांबळे यांच्यासह हजारो महिला युवक व कार्यकर्ते,विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. धनगर आरक्षणासाठी आयोजित मोर्चामध्ये लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून धनगर समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवली होती.
0 टिप्पण्या