वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यासाठी आणि चौकासाठी राजपूत समाजाचे लातूर मनपा आयुक्तांना निवेदन ; दसऱ्यापर्यंत निर्णय न झाल्यास आत्मदहनाचा इशारा...

 वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यासाठी आणि चौकासाठी राजपूत समाजाचे लातूर मनपा आयुक्तांना निवेदन ; दसऱ्यापर्यंत निर्णय न झाल्यास आत्मदहनाचा इशारा...                                                                




औसा प्रतिनिधी : - वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पूर्णकृती अश्वारूढ पुतळ्याची स्थापना आणि त्यांच्या नावाने चौक निश्चित करण्याच्या मागणीसाठी राजपूत समाजाच्या वतीने लातूर शहर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. या प्रलंबित मागणीवर आगामी दसऱ्यापर्यंत योग्य ती कारवाई न झाल्यास मनपा कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा राजपूत  समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, लातूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा दि. १९ नोव्हेंबर २०१८ मधील विषय क्रमांक ६ आणि ठराव क्रमांक ८२ अन्वये महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यासाठी 'जुना रेणापूर नाका' येथील जागा सुनिश्चित करण्यात आली होती व त्याला तत्वतः मान्यताही मिळाली होती. परंतु, हा ठराव असतानाही सदर जागा इतर समाजास देण्यात आली, ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून राजपूत  समाजाने नवीन जागेसाठी वारंवार निवेदने दिली. मात्र, त्यावर आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. देशाचे गौरव असलेल्या महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकासाठी करणी सेनेने प्रशासनासमोर खालील चार पर्यायी जागांचे पर्याय सुचवले आहेत :

• राजस्थान शाळेसमोरील चौक

• दयानंद कॉलेजसमोरील चौक

• नंदीस्टॉप

• जुने रेल्वे स्थानक स्वेटर मार्केट

"या चार पर्यायी जागांपैकी कोणत्याही एका ठिकाणी दसऱ्याच्या दिवसापर्यंत वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह चौक असे नामकरण करून मनपाच्या वतीने तसा फलक लावावा आणि अश्वारूढ स्मारक उभे करावे," अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावर योग्य निर्णय न झाल्यास तीव्र पाऊल उचलत आत्मदहन केले जाईल, असा इशारा करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख अनिल जमादार आणि जिल्हाध्यक्ष देवराणा राजपूत यांनी दिला आहे.

या निवेदनाची प्रत लातूर महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात स्वीकारण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या