शिवगिरी परिसरातील १.०५ कोटींच्या विकासकामांचा आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते शुभारंभ
औसा प्रतिनिधी
औसा, दि. २६ (प्रतिनिधी) : औसा नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. २ अंतर्गत शिवगिरी परिसरातील विविध विकासकामांचा शुभारंभ रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. डॉ. करमुडी यांच्या दवाखान्यासमोर आयोजित कार्यक्रमात एकूण १ कोटी ५ लाख रुपयांच्या विकासकामांना प्रारंभ करण्यात आला.
या विकासकामांत आनंद औसेकर यांच्या घरापासून डॉ. लसणे यांच्या घरापर्यंत २० लाख रुपयांचा सिमेंट काँक्रीट रस्ता, डॉ. लसणे यांच्या घरापासून संगय्या स्वामी यांच्या घरापर्यंत १० लाख रुपयांचा रस्ता, तसेच भालचंद्र जाधव यांच्या घरापासून शिवशंकर स्वामी यांच्या घरापर्यंत २५ लाख रुपयांची बंदिस्त नाली उभारण्यात येणार आहे. याशिवाय शिवगिरी परिसरातील इतर विविध विकासकामांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, एकूण १.०५ कोटी रुपयांच्या विकासकामांना प्रारंभ झाला आहे.
या प्रसंगी नगरसेवक सुनीलप्पा सिद्रामप्पा मिटकरी, नगरसेविका सौ. ऐश्वर्या पवनराज राचट्टे, भारतीय जनता पक्षाचे औसा शहराध्यक्ष शिवरुद्र मुर्गे, भीमाशंकर मिटकरी, धनराज परसणे, मंथन मिटकरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी शहरातील सर्व भागांचा समतोल विकास करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. शिवगिरी परिसरातील रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था आणि अन्य मूलभूत सुविधांमध्ये या विकासकामांमुळे मोठी सुधारणा होणार असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनातही सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

0 टिप्पण्या