गुळखेडा वाडी ओढ्यावर पूल नसल्याने शेतकऱ्यांना करावी लागतेय मोठी कसरत; जीव मुठीत धरून जावे लागते शेतात

 गुळखेडा वाडी ओढ्यावर पूल नसल्याने शेतकऱ्यांना करावी लागतेय मोठी कसरत; 


जीव मुठीत धरून जावे लागते शेतात 




औसा प्रतिनिधी 


तालुक्यातील गुळखेडावाडी या गावी ओढ्यावर पूल नसल्याने शेतात येण्याजाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आता पावसाळ्याचे  दिवस सुरू असताना, ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून ओढा पार करावा लागत आहे. पावसाचा जोर वाढल्यास वाहणाऱ्या पाण्याला वेग येतो तेंव्हा दोन्ही बाजूस दोरी बांधून, दोरीच्या मदतीने ,एकमेकांना सोबत धरून शेतकऱ्यांना ओढा सर करावा लागतो. अशा वेळेस हात सुटून बरेच शेतकरी 100-150 मीटर पर्यंत वाहून गेल्याच्या घटना येथे घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी या ओढ्यावरील पुलांची अत्यंत गरज आहे.

ऐन पावसाळ्याच्या दिवसात हा ओढा दुथडी भरून वाहतो. शेतातील पाणी वाहून या ओढ्यात येते पुढे हेच पाणी तेरणा नदीला जाऊन मिळते. दररोज जवळपास 40-50 शेतकऱ्यांना रोज नवीन अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील शेती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट या सदरात मोडणारी आहे. याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. सतत होणारी नापिकी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ या संकटामुळे अनेक शेतकरी पिंजून गेला आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या ओढ्यावरूनच वाहतुक करावी लागते खुप लांब पासून या ओढ्याला पाणी येत असल्याने धोका वाढला आहे.महिलांना व लहान मुलांना मोठ्या अडचणी येत असून गावातील शेतकऱ्यांच्या  बायका ह्या आजही डोक्यावर पाटी घेऊन शेतात जातात, डोक्यावरील पाटी घेऊन ओढा पार करणे त्यांना शक्य होत नाही. बऱ्याच वेळा पाय घसरून पाटीत असलेला जेवणांचा डब्बे सांडून जातो. त्यामुळे परत स्वयंपकाची वेळ त्यांच्यावर येते. ओढ्याला पाणी जास्त असल्यास लहान मुलांना हा ओढा पार करणे शक्य होत नाही.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ओढ्यावरील पुलांचे काम करावे अशी मागणी या गावातील महिला,लहान मुले,शेतकरी करत आहेत.


---------------


गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे ओढ्याला पाणी जास्त आले होते. आम्ही सर्वजण मिळून या ओढ्यातून दोरीच्या मदतीने ओढा पार करत होतो तेंव्हा जास्त पाण्याच्या प्रवाहामुळे माझा हात सुटला आणि मी वाहत चाललो होतो. पण इतर शेतकऱ्यांनी माझी मदत करून मला वाचवले. ओढ्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आ.पवार साहेब यांनी लवकरात लवकर याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे अमोल भोसले या शेतकऱ्याने सांगितले

---------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या