किल्ला मैदान येथील शॉपिंग सेंटरचा लिलाव करा -औसा शहर काँग्रेसची जोरदार मागणी!
औसा (प्रतिनिधी): औसा शहरातील किल्ला मैदान येथील नगर परिषद मालकीच्या कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या शॉपिंग सेंटरचा लिलाव त्वरीत करण्यात यावा, अशी ठाम मागणी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खुंदमीर मुल्ला यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर शॉपिंग सेंटरचे बांधकाम पूर्ण होऊन ७ ते ८ वर्षे उलटून गेली असतानाही, आजवर त्याचा कोणताही वापर न झाल्यामुळे हे केंद्र धुळखात पडले आहे. नगर परिषदेची सध्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असूनही उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या या शॉपिंग सेंटरचा लिलाव अद्याप न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्य रस्त्यालगत असलेल्या या जागेला व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद असून, शेकडो व्यापाऱ्यांनी भाडे तत्वावर गाळे घेण्यास उत्सुकता दर्शवली आहे. त्यामुळे नगर परिषदेला त्वरित लिलाव प्रक्रिया सुरू करून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग खुला करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिलेल्या या निवेदनावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या