चोरीला गेलेल्या लोकशाहीला शोधण्यासाठी महाड पोलिसात तक्रार दाखल
रायगड :शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेच्या स्वराज्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही स्थापन करुन भारताला सविधान दिले आहे. त्याची आज चोरी झाली असल्याची तक्रार कोकणात रायगड जिल्ह्यातील महाड पोलिसात दाखल केली असून ती शोधण्यासाठी लोकशाही शोधत चाललो मी ही आगळी वेगळी मोहीम घेऊन पक्षाचे झेंडे बाजूला ठेवत शेतकरी शेतमजूर आणि निराधार एकत्र आल्याचे चित्र संपूर्ण राज्यात तयार झालेलं दिसून येत आहे.
शेतकरी नेते राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांच्या नेतृत्वात रायगड किल्ल्यावर राज्यातील तरुण कार्यकर्ते एकत्र येऊन शिवछत्रपती शिवरायांना त्यांच्या 394 व्या जयंती दिनी विनम्र अभिवादन करुन देशात चोरीस गेलेल्या रयतेच्या स्वराज्यातील लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघाती आरोप करताना प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडात लाथ घालू अशी शपथ सुद्धा घेण्यात आली.
भारताला संविधान देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाड येथील पवित्र आणि ऐतिहासिक स्थळी पाण्याचा सत्याग्रहाच्या निमित्ताने नैसर्गिक मानवी मुल्ल्यासाठी लढा उभा केला त्याच ठिकाणच्या मातीला वंदन करुन लोकशाही शोधण्याच्या मोहिमेची दिशा ठरवण्यात आली असून संपूर्ण राज्यातील पोलिसात सदर प्रकरणी तक्रारी दाखल केल्या जातील.
आज देशात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे,कायदा सुव्यवस्थेचा बट्याबोळ झालेला आहे, न्यायव्यवस्था राजकारण्याची बटीक बनलेली आहे,जगाला जगवणारा शेतकरी आत्महत्या करत असून शेती मालाला भाव नसल्याने संपूर्ण गांवगाडा उध्वस्त झालेला आहे.अंबानी अदानीचे कर्ज माफ केले गेलं आहे आणि सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं चाललंय. जाती जातीत, धर्मा धर्मात भांडणे लावून लोकशाहीचे लक्तरे वेशीवर टांगले चाललीत.जनतेपुढे खरी वास्तवता आणणाऱ्या माध्यमाची गळचेपी करुन विचारवंतावर जीवघेणे हल्ले होऊ लागलेत प्रसंगी खून केले जात आहेत. शासकीय यंत्रणेला हाताशी धरून संविधानच उध्वस्त केलं जात आहे. आज देशात लोकशाहीच चोरी गेल्याने आमच्या आया बहिणीची इज्जत सुरक्षित राहिली नाही. अधिक घाम गाळणाऱ्या श्रमिक शेतकरी शेतमजूर नोकरदार यांना दाम नाही उलटपक्षी उच्च पदस्थ अधिकारी ऐत खाऊंना जास्त दाम अशी टोकाचे धोरण बनवलं गेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी न घेता सत्तेच्या विकेंद्रीकरणाला हरताळ फासला चाललाय.दिवसा ढवळ्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आमदार पोलीस स्टेशन मध्येच एकमेकांवर गोळीबार करुन गुंडाराज आणून दहशत माजवत आहेत. आंदोलकांना तुरुंगात डांबलं जात आहे जणू देशात अघोषित आणीबाणी असून लोकशाहीची हत्या करुन हुकूमशाही निर्माण झाली असल्याचे भयावह चित्र दिसत आहे
आगामी काळात संपूर्ण देशात चोरी गेलेल्या लोकशाहीच्या शोधात तरुणांनी पुढे येऊन जातीसाठी नव्हे तर मातीसाठी सुद्धा एकत्र यावे लागेल त्यासाठी आम्ही समविचारी संघटना संस्था व्यक्ती विचारवंत पत्रकार यांना साकडे घालून शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या रयतेच्या राज्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधान आणि लोकशाहीची पुन:स्थापना करु अशी माहिती प्रसिद्धी पत्रक काढून दिली आहे
यावेळी सत्तार पटेल, अरुण दादा कुलकर्णी, शाम जाधव, हणमंत सुरवसे, सुरेश सूर्यवंशी,बिभीषण कदम,मुक्ताराम काळे, प्रकाश घोरपडे, शरद रामशेटे,अंगद पवार,लातूर, चैत्राली शेलार रत्नागिरी, गिरीश बागुल, दिनेश वाघ, मारुती जाधव, किशोर वणवे धुळे, त्र्यंबक सूर्यवंशी धाराशिव, प्रकाश बोरसे, अनिल मरसाळे जळगाव, अरुण कदम महाबळेश्वर सातारा, नितीन शिंदे, सागर गोडसे पंढरपूर, विकास जाधव, मल्हारी कांबळे सांगली, लक्षमण पवार, सुरेंद्र सूर्यवंशी नांदेड, सुनील चौधरी, अमोल भोईटे बीड, अनिल पांडुरे संभाजी नगर, जीवन काळे, सुनील गुडेकर जालना, रुपेश मर्चंडे मंडणगड रायगड, प्रशांत खंडाईत मुंबई, हर्षद गोळे पुणे, विशाल शिंदे अहमद नगर,नाना जाधव नाशिक, पुरुषोत्तम मोतीपवळे हिंगोली, पिराजी सावळे परभणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते
0 टिप्पण्या