धुक्यात हरवला गाव माझा धूक्यापासून रब्बी पिकांचे संरक्षण करणे गरजेचे तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन.

 धुक्यात हरवला गाव माझा

धूक्यापासून रब्बी पिकांचे संरक्षण करणे गरजेचे 

तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन.



औसा प्रतिनिधी 

 

औसा: तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या 28 नोव्हेंबर रोजी सकाळी आणि रात्री असे एकाच दिवसामध्ये  महावेधच्या आकडेवारी नुसार भादा महसूल मंडळामध्ये ९२.३ मि. मी. अवकाळी पावसाची नोंद झाली आहे.या पावसामुळे व सध्या पडत असलेल्या धुक्यापासून रब्बी हंगामातील पिकांची योग्य संरक्षण करणे गरजेचे आहे. सध्या पडत असलेले धूके हे पिकाच्या फुलगळीचे आणि चट्टे गळीचे प्रमुख कारण होऊ शकते. तूर या पिकाची धुक्यामुळे होणारी फुलगळ व चट्टेगळ थांबविण्याकरिता एन ए ए या संप्रेरकाची ४ मीली अधिक १० मीली बोरॉन यांची १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या तूर या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि काही ठिकाणी फायटोप्थेरा मर या रोगाचा प्रादुर्भाव पण दिसून येत आहे. याकरिता इमामेक्टिन बेंजोएट ५% हे कीटकनाशक - ४.५ ग्रॅम अधिक मेटॅलॅक्झिल + मॅन्कोझेब हे बुरशीनाशक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव येऊ नये म्हणून जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा व थायोफिनेट मिथाईल ७० डब्लू पी या बुरशीनाशकाची २५ ग्रॅम किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभऱ्यामध्ये घाटेअळी चा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास हेक्टरी २ कामगंध सापळे लावावेत व १० पक्षीथांबे उभे करावेत‌. हरभऱ्यावरील घाटे अळीचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी इमामेक्टिन बेंजोएट ५% हे कीटकनाशक - ४.५ ग्रॅम किंवा फ्लूबेंडामाईड ३९.३५ एस सी ३ मीली प्रति १० लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी. उशिरा पेरलेल्या ज्वारीवर खोडमाशी, खोडकिडी व लष्करी अळी यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. याकरिता थायमिथोक्झाम १२.६%+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% या संयुक्त कीटकनाशकाची २.५ मीली किंवा इमामेक्टिन बेंजोएट ५% या कीटकनाशकाची - ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी ज्वारीचे पिक ३० दिवसांचे झाल्यानंतर एकरी ३५ किलो युरिया कोळपणीद्वारे ज्वारीच्या ताटाला माती लावून घ्यावा. अशाप्रकारे रब्बी पिकांचे संरक्षण शेतकऱ्यांनी करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या