विद्यार्थ्यांच्या भविष्याशी ,आरोग्याशी खेळणा-या जिल्हा परिषद शाळेचा भोंगळ कारभार, शिवसेनेच्या जयश्रीताई उटगे यांनी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आणला चव्हाट्यावर !
औसा प्रतिनिधी: देवणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आणि अनियमितता समोर आल्या असून, यासंदर्भात चौकशी करून संबंधितांवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जयश्रीताई उटगे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
स्थानिक नागरिकांनी शुक्रवार, दिनांक २७ जून २०२५ रोजी देवणी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता, खालीलप्रमाणे अत्यंत विदारक परिस्थिती समोर आली.
* शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह: इयत्ता नववीच्या वर्गावर विषय शिक्षकाऐवजी एक कनिष्ठ कारकून इतिहासाचा तास घेताना आढळून आला. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
* अस्वच्छता आणि दुरवस्था: मुलींच्या शौचालयाची अवस्था अत्यंत वाईट होती, तर पोषण आहाराचे किचनही अत्यंत अस्वच्छ आणि वाईट अवस्थेत आढळले.
* सुरक्षेचा अभाव: मुलींच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत संरक्षण भिंत आणि शौचालय नसल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
* धोकादायक इमारत: शाळेची संपूर्ण इमारत अत्यंत धोकादायक परिस्थितीत असून, इमारतीचे ऑडिट किंवा डागडुजी करण्याचा कोणताही प्रस्ताव शाळेकडून दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
* निष्क्रिय प्रयोगशाळा आणि कचरा: शाळेतील विज्ञान प्रयोगशाळा अनेक महिन्यांपासून धूळखात पडलेली आढळली, तर प्रत्येक वर्गात कचरा होता. धक्कादायक बाब म्हणजे अनेक वर्गांचा वापर भंगार गोळा करून ठेवण्यासाठी केला जात होता.
* शिक्षकांची गैरहजेरी: रजेचा अर्ज किंवा मस्टरवर सह्या नसतानाही काही शिक्षक गैरहजर आढळून आले.
* कमी पटसंख्या: प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची संख्या अतिशय कमी आढळून आली, जे शाळेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
* शोभेचे सीसीटीव्ही: शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोभेसाठी लावण्यात आलेले होते.
या गंभीर गैरप्रकारांवर तातडीने लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जयश्रीताई उटगे यांनी केली आहे.यावेळी शिवसेना देवणीचे शहरप्रमुख दिपक स्वामी, उपजिल्हा संघटिका निलंगा सरोजनाताई गायकवाड,निलंगा तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या