अयोध्या येथील श्रीराम मंदिर अक्षता कलशाची औसा येथे भव्य शोभायात्रा..

 अयोध्या येथील श्रीराम मंदिर अक्षता कलशाची औसा येथे भव्य शोभायात्रा..


 औसा प्रतिनिधी

 दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी रोजी आयोध्या येथील मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या भव्य मंदिरात मूर्तीची स्थापना करण्यात येणार असून देशभरातील गावागावात आयोध्या येथून अक्षता कलशाचे दर्शन घेण्यासाठी पाठविण्यात आला आहे. रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी अक्षता कलशाचे औसा शहरात आगमन होताच ऐतिहासिक किल्ला मैदानावरून आयोध्या येथील अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये महिला भजनी मंडळ व टाळकरी, वारकरी दिंडीच्या साह्याने जय श्रीराम आणि प्रभू रामचंद्र की जय चा जयघोष करीत शेकडो युवक व महिला शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर आणि मराठा समाजाचे महंत राजेंद्र गिरी महाराज यांनी अमृत कलशाचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी सौ. शोभाताई अभिमन्यू पवार, माजी नगराध्यक्ष किरण राजशेखर उटगे, सुशीलकुमार बाजपाई, सुनील उटगे, बंडू कोद्रे यांच्यासह अनेक राम भक्त आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही शोभायात्रा लातूर वेस हनुमान मंदिर येथे आल्यानंतर अक्षता कलशाची मंत्रोच्चाराने विधिवत पूजा करण्यात आली तसेच औसा शहरातील विविध जाती धर्माच्या 11 जोडप्यांच्या हस्ते अक्षता कलशाचे पूजन करण्यात आले अक्षता कशाचे पूजन झाल्यानंतर आरतीने या कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित रामभक्त साठी हनुमान मंदिरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या